अध्यक्षांचे मनोगत
श्री.शैलेश प्रकाश गोजमगुंडे
अध्यक्ष
शाखा स्थापनेपासूनच अध्यक्ष होण्याचा बहुमान मला प्राप्त झाला. हे मी माझं भाग्य समजतो. शाखा स्थापनेपासूनच शाखेने लातूर व परिसरातील नाट्य चळवळीला अधिकचे बळ देण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न केले आहेत. सुरुवातीलाच लातूर मधील सर्व नाट्य संस्थांचे प्रमुख सदस्य सोबत घेऊन कार्यकारिणी केली गेली. जिच्या माध्यमातून दर वर्षी नाट्य कार्यशाळांचे आयोजन केले जाते. कोरोना काळात ऑनलाईन सिस्टीमचा वापर करुन भेदरलेल्या समजमनाला स्थीर करण्याच्या दृष्टीने शाखेने राज्य स्तरीय प्रेमपत्र स्पर्धेस आयोजन केले. ज्यात राज्यभरातून 155 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. शाखेने राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेऊन “मुक्ती” हे नाटक सोलापूर केंद्रावर सादर केले. ज्यात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक मिळाले. तर केंद्रावरील सर्व वैयक्तिक प्रथम पारितोषिके पटकावत नाटक पहिले आले. ज्यात दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा – वेशभूषा ही प्रथम पारितोषिके तर स्त्री व पुरुष अभिनयांसाठीची रौप्य पदके मिळवली.
याच बरोबर लातूर व परिसरातील नाट्य चळवळ अधिक प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने गेली 3 वर्षे लातूरला स्वतंत्र राज्य नाट्य केंद्र व्हावे यासाठी शाखा प्रयत्नशील आहे. त्याला 50% यश प्राप्त झाले असून लातूरला उपकेंद्र मंजूर झाले आहे. स्वतंत्र केंद्र येण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रवेशिका येणे आवश्यक होते. त्यासाठी शाखेने विशेष प्रयत्न केले ज्याला यश आले व एकट्या लातूर मधून इतिहासात पहिल्यांदाच 12 संघानी सहभाग घेतला. ज्यातून जुणे व नवे रंगकर्मी मिळून तब्बल 200 हून अधिक कलाकारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. तर हजारो नाट्य रसिकांनी या नाटकांचा रसास्वाद घेतला.
दि. 18/12/2023 रोजी शाखेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपलेली असल्या कारणाने सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड झाली. यात लातूर व परिसरातील सर्व नाट्य संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समवेश आहे. यासाठी मध्यवर्ती कडून निरीक्षक म्हणून मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष श्री सतीश लोटके हे उपस्थित होते.
थोडक्यात काय तर नाट्य चळवळीला अधिक मजबूत करण्यासाठी, मराठी रंगभूमी प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने शाखा सर्वांना सोबत घेऊन सर्व नाट्य संस्थांची पालक संस्था म्हणून काम करते आहे.